पटोले, वडेट्टीवार आणि राऊतांसमोर नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा!

नागपूर/प्रतिनिधी नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्यासारखे राज्यातील पहिल्या फळीतील नेते उपस्थित असताना त्यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत खुर्च्या फेकत, एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा वाद बोलण्यासाठी माईक मिळण्यावरुन झाल्याचे समजते. नागपूर शहर काँग्रेसने आयोजित केलेली ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती. मात्र, चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी भलत्याच मुद्द्यावरुन प्रकरण तापले आणि ते गुद्द्यांवर आले. त्यातच ज्येष्ठ नेत्यांसमोरच हा प्रकार घडल्याने काँग्रेसची नाचक्की झाली आहे. तसेच, पक्षांतर्गत मतभेद किती टोकाचे आहेत हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

भाजपसारख्या बलाढ्य पक्षाविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी देशातील एकमेव असलेला विरोधी पक्षातील मोठा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस जर अशा पद्धतीने वर्तन करत असेल तर त्यातून संदेश काय द्यायचा? असा सवाल आता काँग्रेसमधीलच कार्यकर्ते विचारु लागले आहेत. राहुल गांधी हे चांगले शिक्षित आहेत. उच्चविद्याविभूषित आहेत. मात्र, ते चांगले वक्ता नाहीत. त्यांना आपले मुद्दे आक्रमकपणे मांडता येत नाही, असे विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावरुन काँग्रेस कार्यकर्ते अगोदरच नाराज आहेत. त्यातच वडेट्टीवार यांनी या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे तुम्ही येथे आलातच कसे काय? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला.