आरक्षण विधेयक मंजुरीनंतर दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राचे आज रात्री उशिरा सूप वाजले. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती जगदीप धनकड यांनी केली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचे म्हटले. संसदेचे विशेष अधिवेशन हे १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आले होते. सरकारने कोणताही अजेंडा जाहीर केला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यामध्ये संसदेच्या जुन्या वास्तूमधून नव्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यात आला. मंगळवारी विशेष अधिवेशनादरम्यान कायदामंत्री अजर्ुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडले होते. बुधवारी लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आले.

राज्यसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत हजेरी लावली. लोकसभेत पंतप्रधान दाखल झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित होत असल्याची घोषणा लोकसभा अध्यक्षांनी केली. महिला आरक्षण विधेयकासंदर्भात केलेली घोषणा ही नव्या संसद भवनात मोदींनी केलेली पहिली मोठी घोषणा आहे.