पोलीस पाटील अमित फासगे यांच्या अवयवदानातून पाच रुग्णांना नवजीवन

वर्धा/प्रतिनिधी ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यूशी झुंज देणारे सेलू तालुक्यातील जयपूर येथील प्रयोगशील शेतकरी व कर्तव्यनिष्ठ पोलीस पाटील अमित फासगे (४८) यांच्या अवयवदानामुळे पाच रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले. जिवंतपणी परिसरातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा युवा कार्यकर्ता मृत्यूशी झुंजत असताना परिवारातील सदस्यांनी अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. अमित फासगे यांना अत्यवस्थ वाटत असल्यामुळे मंगळवारी (१२ रोजी) सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयाच्या आकस्मिक विभागात त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे तात्काळ प्राथमिक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी ब्रेन स्ट्रोकचे निदान करीत उपचार सुरू केले. त्यांचा मेंदू मृतवत झाल्याचे लक्षात येताच दुसऱ्या दिवशी परिवारातील सदस्यांना याबाबत कल्पना देण्यात आली. वैद्यकीय उपचारांना रुग्णाकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता पूर्णतः मावळल्याने रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे व अवयव प्रत्यारोपण समन्वयक डॉ. रुपाली नाईक यांनी अमित यांच्या पत्नी माधुरी आणि भाऊ प्रदीप, सुरेश व नितीन यांच्याशी अवयवदानाबाबत सल्लामसलत केली.

फासगे परिवारातील सदस्यांनीही मनाचा मोठेपणा दर्शवित अवयवदान करण्यास स्वीकृती दिली. आप्तजनांची अनुमती दिल्यानंतर क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने दि. १४ रोजी बैलपोळ्याचा सण असताना डॉक्टरांनीही शरीरातून अवयव विलग करण्याची शस्त्रक्रिया पूर्ण करीत आपले कर्तव्य पार पाडले. या अवयवदानातून रुग्णाच्या एका किडनीचे प्रत्यारोपण सावंगी मेघे रुग्णालयातच करण्यात आले. अन्य अवयव ग्रीन कॉरिडॉर निर्माण करीत नियोजित रुग्णालयांना पाठविण्यात आले. नागपूर येथील किम्स किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण तर न्यू इरा हॉस्पिटलमध्ये लिव्हर म्हणजे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

याशिवाय, अहमदाबाद (गुजरात) येथील मारेंगो सिम्स हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसे पाठविण्यात आलीत. तसेच, नेत्रपटलाचे (कॉर्निया) अन्य रुग्णावर रोपण करण्यात आले. या अवयव विलगीकरण व प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत झेडटीसीसीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांच्यासह डॉ. अक्षय कृपलानी, डॉ. शिवचरण बालगे, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमित पसारी, डॉ. कपिल सेजपाल, डॉ. प्रसाद गुर्जर, डॉ. शुभम दुबे, डॉ. प्रांजल काशीव, डॉ. सनी मालदे, डॉ. ज्ञानेश ठाकर, डॉ. किशोर गुप्ता, उल्हास पढियार, डॉ. सुनील अग्रवाल, भारत परिहार, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डॉ. ईशान, रेडिओलॉजिस्ट डॉ. परिहार, डॉ. राहुल गुट्टे, डॉ. अनुज चतुर्वेदी यांचा सहभाग होता. या एकूणच या प्रक्रियेत सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. रुपाली नाईक, प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, प्रियांक अचिमोते, अर्चना साखरकर, प्रतिमा सांगोलकर, मनोज महाकाळकर, वैशाली उगेमुगे, मृणाल बांबोडे तसेच परिचारक वृंदाने विविध पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, पोलीस निरीक्षक धनाजी जळक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस, झेडटीसीसीचे राहुल सक्सेना, दिनेश मंडपे यांचे सहकार्य लाभले.