जरांगेंकडून सरकारला एक महिन्याचा अवधी; पण घातल्या पाच अटी

जालना/प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत आहेत. अखेर काल सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, अशी आशा मराठा समाजाला वाटत आहे. सरकारने न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे, याकरता एक महिन्याचा अवधी मागितला आहे. त्यामुळे समस्त मराठा समाजाच्या वतीने ही मुदत मान्य करत मनोज जरांगे यांनी उपोषण शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचसोबत त्यांनी सरकारपुढे पाच अटी ठेवल्या आहेत. एक महिन्यानंतर सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देईपर्यंत मी घरी जाणार नाही.

समितीचा अहवाल एका महिन्याने काहीही येवो, पण सर्व मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायलाच हवं. सरकारला ४० वर्षे दिले आहेत, त्यामुळे आणखी एक महिना द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. पण, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, मी तुमच्या हिताचाच निर्णय घेणार, आपल्या समाजाला डाग लागेल असं कोणतंही कृत्य मी करणार नाही. यावेळेस त्यांनी समोर उपस्थित मराठा समाजाच्या लोकांना सरकारला एक महिन्याचा अवधी देण्याबद्दल तुम्ही सहमत आहात का, असं विचारलं. लोक सहमत नसतील तर निर्णय बदलण्याची तयारी दर्शवली. मात्र, बहुसंख्य लोकांनी दोन्ही हात उंचावून हा निर्णय मान्य असल्याचे सांगितले.