विनापरवानगी बांधकाम राजेश ऑटोच्या मालकाला भोवले

हिंगणघाट/प्रतिनिधी येथील राजेश ऑटोचे मालक राजेश लेखराम बत्रा यांनी स्थानिक कारंजा चौकातील त्यांच्या दुकानाचे वरच्या मजल्याचे विनापरवानगी बांधकाम त्यांना चांगलेच भोवले. अतिक्रमण विरोधी पथकाने रविवार १० रोजी रात्री बांधकाम साहित्याची जप्ती करीत कारवाई केली. सदर कारवाई मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी निलेश शिंदे, अतिक्रणविरोधी पथकाचे प्रमुख प्रवीण काळे यांनी पथकासह रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान केली.

या अवैध बांधकाम विरोधात परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. पालिकेने आक्षेप घेत या बांधकामावर जैसे थे आदेश जारी केला होता. परंतु, बत्रा यांनी या आदेशास न जुमानता दुकानाच्या वरच्या मजल्याचे अवैध बांधकाम सुरूच ठेवले होते. याबद्दल संतप्त नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यानंतर नगरपालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेत बांधकाम थांबविण्याचे कठोर आदेश दिले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडून दखल घेत बांधकामाकरिता आणलेली विटा, रेती व इतर साहित्य जप्तीची कारवाई करण्यात केली.