मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

मुंबई/प्रतिनिधी राज्यात सुरु असलेला मराठा आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस जोर धरत आहे. आज सलग बारावा दिवस असूनही मनोज जरांगे यांचे उपोषण सुरुच आहे व ते अधिक तीव्र करण्याचा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने दोन दिवसांपूर्वी जीआर काढून मराठा आरक्षणाची मागणी मान्यदेखील केली होती. मात्र, यातील वंशावळ हा शब्द काढून टाकून सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी दाखले देऊन आरक्षण मान्य केले जावे, अशी मागणी जरांगेंनी सरकारपुढे ठेवली आहे.

या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असफल ठरत असून बाराव्या दिवशीदेखील ते उपोषणावर ठाम आहेत. मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी देखील अपयशी ठरली. मनोज जरांगेंच्या मागणीवर मुंबईत झालेल्या बैठकीत नवीन जीआर काढण्यात आला मात्र या जीआर मध्ये दुरुस्ती झाली नसल्याने उपोषण सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. या सर्व पोर्शभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट, काँग्रेस, मनसे यांच्यासह ठाकरे गटालाही बैठकीच निमंत्रण दिले जाणार आहे.