आयुष्मान भव मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीची सभा

वर्धा/प्रतिनिधी राज्य व जिल्ह्यात केंद्र शासनाची महत्वकांक्षी आयुष्मान भव मोहिम दि. ९ सप्टेंबर पासुन ३१ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान ३२ सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेचा ० ते १८ वर्ष वयोगटातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीच्या बैठकीत केले. जिल्ह्यात दि.१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भव मोहिम व विशेष इंद्रधनुष्य मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. रा.ज.पराडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, सेवाग्रामचे अधिष्ठाता डॉ. सुबोध शरण गुप्ता, सावंगीचे डॉ. अहमिन्दर जैन, आयएमचे प्रतिनिधी डॉ. जयंत मकरंदे, आयएपीचे प्रतिनिधी डॉ. आर.आर.बोरकर, डॉ. दिनेश राठोड, जितेंद्र शिंदे, शेख हूसेन, प्रशांत आदमने, मयुर भारद्वाज उपस्थित होते. मोहिमे दरम्यान अंगणवाडीतील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील बालकांची आरोग्य तपासणी करुन आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया करण्याकरीता संदर्भित करण्यात येणार त्यामुळे जास्तीत जास्त ० ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे रोहन घुगे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. रा.ज.पराडकर यांनी आयुष्मान भव या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना दि.१ सप्टेंबर पासुन उपक्रमाची सुरूवात करुन उपक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कृती आराखडा तयार करण्याबाबत व त्यानुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी व जनजागृती करण्याबाबत सुचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले. सभेमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची दुसरी फेरी दि.११ ते १६ सप्टेंबर पर्यंत राबविण्याच्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केलेले आहे. मोहिमे दरम्यान एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. पराडकर यांनी बैठकीत दिली.