हिंदी विद्यापीठात भारतीय राज्यशास्त्र परिषदेच्या ६०व्या संमेलनाचे थाटामाटात उद्घाटन

वर्धा/प्रतिनिधी महात्मा गांधी आणि विनोबांच्या कर्मभूमीत आयोजित करण्यात आलेले हे संमेलन विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासात ऐतिहासिक ठरणार असून “वसुधैव कुटुंबकम: एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संमेलनाच्या मुख्य विषयातून संपूर्ण जगाला संदेश दिला जाणार आहे. असे प्रतिपादन वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेच्या ६० व्या संमेलनात स्वागतपर भाषण करताना विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांनी केले. दोन दिवसीय (९ आणि १० सप्टेंबर) संमेलनाचे उद्घाटन बुरहानपूर विद्यापीठ, ओडिशाच्या कुलगुरू प्रो. गीतांजली दास यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या निराला सभागृहात शनिवारी थाटामाटात संपन्न झाले. प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजाराहून अधिक प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत केले. विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम व अभ्यासक्रमांबाबत चर्चा करताना ते म्हणाले की महात्मा गांधी यांच्या नावाने स्थापन झालेले हे विद्यापीठ महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे.

येथे सर्व अभ्यासक्रम हिंदी माध्यमातून चालवले जातात. हिंदी माध्यमातून ज्ञान निर्मिती आणि प्रसारासाठी स्थापन केलेले हे विद्यापीठ इतर भारतीय भाषांना घेऊन चालते. येथे इंग्रजी भाषेसोबतच परदेशी भाषांचेही अध्ययन व अध्यापन सुरू आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हे अधिवेशन अद्वितीय ठरणार असून, तुम्हा सर्वांना ऐतिहासिक अनुभव देणारे ठरेल, असे ते म्हणाले. हे संमेलन येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विेशासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे (आयपीएसए) सरचिटणीस व कोषाध्यक्ष तथा महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ, मोतिहारी (बिहार)चे माजी कुलगुरू प्रो. संजीवकुमार शर्मा यांनी परिषदेचा वार्षिक अहवाल सादर केला. उद्घाटन समारंभाला भारतीय उच्च अध्ययन संस्था, शिमला, हिमाचल प्रदेशच्या माजी अध्यक्ष आणि महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बिकानेर (राजस्थान) च्या माजी कुलगुरू डॉ. चंद्रकला पाडिया, मद्रास विद्यापीठ, चेन्नई, तामिळनाडूचे माजी कुलगुरू प्रो. आर. थंडवन आणि हिंदी विद्यापीठाच्या अनुवाद विद्यापीठाचे डीन आणि संमेलनाचे स्थानिक आयोजक सचिव प्रो. कृष्ण कुमार सिंह मंचावर होते. यावेळी अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

अधिवेशनात अहवाल सादर करताना डॉ. संजीवकुमार शर्मा म्हणाले की, वर्धा येथे आयोजित संमेलनाचे भारतीय राज्यशास्त्राच्या इतिहासातही नाव लिहिले जाईल. ते म्हणाले की देशभरातून १२५० प्रतिनिधींनी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी केली होती आणि बहुतांश प्रतिनिधींनी अधिवेशनाला हजेरी लावली आहे. या संमेलनाची ही ऐतिहासिक उपलब्धी होय. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीतून देशातील राज्यशास्त्राचे भविष्य उज्ज्वल असल्याचे प्रदर्शित होते. अध्यक्षीय भाषणात प्रो. गीतांजली दास म्हणाल्या की, वर्धा हे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. वर्धा ही महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्याने संमेलनासाठी हे योग्य ठिकाण आयोजकांनी निवडले असावे. त्यांनी सेवाग्राम येथील नयी तालिम शिक्षण पद्धतीचा उल्लेख केला व ती कशी उपयोगी आहे, हे पटवून दिले. त्यांनी जागतिक परिप्रेक्ष्यातून महामारी, हवामान बदल, भूक आणि लैंगिक समानता यावर सविस्तर चर्चा केली. प्रो. चंद्रकला पाडिया म्हणाल्या की, राज्यशास्त्रात व्यक्तीची धारणा महत्त्वाची मानली जाते. आपण नात्यांचा समूह आहोत. आपल्यात साम्य आहे.

आपला धर्म हा सामाजिक आणि राजकीय आधारावर आधारित आहे. पाश्चिमात्य देशांच्या राज्यशास्त्राच्या सिद्धांताचा संदर्भ देत त्यांनी भारतीय राज्यशास्त्राच्या महत्त्वाच्या संकल्पनांवर प्रकाश टाकला. यावेळी भारतीय राज्यशास्त्र परिषदेच्या डझनाहून अधिक पुस्तकांचे आणि जर्नलचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दीप्ती राघव यांनी केले तर आभार संमेलनाचे स्थानिक आयोजन सचिव प्रो. कृष्ण कुमार सिंह यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलन, वंदे मातरम् गीत, सरस्वती वंदना आणि कुलगीताने झाली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी देशभरातील आजी-माजी कुलगुरू, राज्यशास्त्राचे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.