पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण

वर्धा/प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी तीन फिरत्या पशुचिकित्सा पथकासाठी सुसज्ज्ा तीन वाहने प्राप्त झाली. पहिल्या टप्प्यात आर्वी, सेलू व समुद्रपूर या तीन तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या पशुचिकित्सा वाहनाचे तालुकास्तरावर स्थानिक आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सेलूसाठी प्राप्त झालेल्या वाहनाचे आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते, समुद्रपूर तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या वाहनाचे आ.समीर कुणावार यांच्याहस्ते तर आर्वीसाठी प्राप्त झालेल्या वाहनाचे आ. दादाराव केचे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. योजनेंतर्गत प्रत्येक वाहनावर एक वाहनन चालक तथा परिचर, एक पदवीधर पशुवैद्यक व पशुधन पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी खातेस्तरावर प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान वाहन विनावापर पडुन न राहता उपलब्ध मनुष्यबळातून कार्य सुरु ठेवण्याच्या सुचनेनुसार योजना पुर्णपणे क्रियान्वित होईपर्यंत उपलब्ध मनुष्यबळातून पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमासाठी जिल्ह्यामध्ये उपयोगात आणण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे सध्या लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये सदर वाहनांची मोठी मदत होत आहे. १९६२ या टोल फ्री क्रमांकाने मध्यवर्ती कॉल सेंटरद्वारे योजनेचे सुसुत्रीकरण होणार असून पुर्ण क्षमतेने सुसुत्रीकरण सुरु करण्याची प्रक्रीया सुरु आहे. फिरत्या पशुस्वास्थ पथकांचा जिल्ह्यात चांगला फायदा होणार असून जनावराचे उपचार, कृत्रिम रेतन त्याप्रमाणे विविध योजनांचे सनियंत्रण, प्रचार प्रसिध्दी, जनजागृती तसेच कार्यमोहिम शिबिरांमध्ये खूप मोठी मदत होणार आहे. त्या पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये पशुपालकांचा निश्चित स्तर उंचावेल असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सांगितले.