समृद्धी महामार्गावर व्हिडीओ बनविणाऱ्यास होणार कारावासाची शिक्षा

वर्धा/प्रतिनिधी लोकार्पण झाल्यापासून सतत चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर प्रवास करताना छायाचित्र काढणे किंवा व्हिडीओ तयार करणे प्रवाशांना चांगलेच महाग पडणार आहे. तसे केल्यास ५०० रुपयांच्या आर्थिक दंडासह एक महिना करावासाची शिक्षा होणार आहे. महामार्गावर छायाचित्र काढणे व व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर आता राज्य महामार्ग पोलिसांची नजर आहे. समृद्धी महामार्गासह राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हा नियम लागू करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण पोलीस याबाबतची कारवाई करणार आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातुन समृद्धी महामार्ग जातो. त्याची जिल्ह्यात एकूण लांबी ५८ किमी आहे. यादरम्यान काही इंटरचेंज देण्यात आले आहे.

महामार्गावर काही उत्साही युवक व नागरिक ताब्यातील वाहन उभे करून व्हिडीओ तयार करतात. सोबतच छायाचित्र काढतात, नंतर ते व्हायरल करतात. हा संपूर्ण प्रकार करताना अनेकदा दुर्घटना घडल्या. धावत्या वाहनात व्हिडीओ बनवितात, समृद्धी महामार्गावरच हे प्रकार पुढे आले आहेत. मोटर वाहन कायद्यानुसार तसे करणे गुन्हा आहे. आता महामार्ग नियंत्रण पोलीस छायाचित्र व व्हिडिओ तयार करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणार आहेत. दंडात्मक कारवाई सोबत एक महिना कारावासाची शिक्षा समनधितास भोगावी लागणार आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना नियमाचे पालन करणे आवश्यकत आहे.