आनंदाची बातमी आनंदाचा शिधा! सणांसाठी गृहिणींच्या खर्चाचा प्रश्न सुटला!

मुंबई/प्रतिनिधी आगामी निवडणुकांच्या पोर्शभूमीवर जनतेला खूश करण्यासाठी सरकार अगदी पुरेपूर प्रयत्न करत आहे. मोदी सरकारने नुकताच भाज्या, पेट्रोल, डिझेल, दूध यांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता राज्य सरकारसुद्धा सणांच्या पोर्शभूमीवर गृहिणींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीचे दिवस जवळ आलेले असताना गरजोपयोगी वस्तूंच्या वाढलेल्या दरामुळे त्रस्त झालेल्या गृहिणींसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. मुंबईत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना १०० रुपयांत “आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो खाद्यतेल देण्यात येईल असं राज्य सरकारने जाहीर केलं आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना हा “आनंदाचा शिधा’ मिळणार आहे.

लाडक्या बाप्पाच्या आगमनसाठी आता काही दिवस उरले आहेत. त्यामुळे हा निर्णय गृहिणींना सुखावणारा आहे. यासाठी सरकारने वेळेवर शिधा संच एकत्रितपणे उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून लाभार्थी, दुकानदारांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिर्द्यरेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगिक खर्चासह ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रती संच २३९ रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.