पोलिसांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वर्धा पोलिस अधीक्षकांचा “ई-दरबार’; राज्यातील पहिलाच उपक्रम

वर्धा/प्रतिनिधी अधिनस्त अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता वर्ध्यातील पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी “ई-दरबार’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. जिल्ह्यामध्ये आठही तालुक्यांत १९ पोलिस ठाणे असून, यामध्ये शेकडो अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांच्या मेडिकल बिल, पोलिस रहिवासी क्वॉर्टरमधील सुविधा, रखडलेली पदोन्नत्ती, रखडलेली वेतनवाढ, कुटुंबीयांच्या अडचणी अशा अनेक तक्रारी असतात. या तक्रारींचा प्रवास ठाणेदार, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालय असा होत असतो.

यामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्रालयीन कर्मचाऱ्यांकडून बरेचदा दिरंगाई होत असल्याने कर्मचारी व अधिकारी नाराज होतात. यामुळे या सर्वांवर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी “ई-दरबार’ हा रामबाण उपाय शोधून काढला. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ई-दरबार घेतला. जवळपास ५४ कर्मचाऱ्यांनी विविध तक्रारी नोंदविल्या असून, त्याची पोलिस अधीक्षक कार्यालय पोलिस अधीक्षकांसह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंद घेतली. निर्भीडपणे साऱ्यांनीच आपल्या अडचणी सांगितल्या. काही तक्रारींचे वेळीच मंत्रालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना करून निरसन केले. तर उर्वरित तक्रारींबाबत वरिष्ठस्तरावर तातडीने पाठपुरावा करून निरसन करण्याची ग्वाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली. याला मिळालेला प्रतिसाद पाहून दर महिन्याला सुनावणी घेऊन समस्या निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.