मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समन्वय समितीचा आक्रोश मोर्चा

वर्धा/प्रतिनिधी मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार १ रोजी आदिवासी समन्वय कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लोक महाविद्यालयाजवळील जुन्या आरटीओ कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरूवात करण्यात आली. आर्वी नाका, शिवाजी चौक, निर्मल बेकरी चौक, इतवारा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मणिपूरमध्ये तीन कुकी महिलांची धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कारही करण्यात आला. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आदिवासी नियम, प्रथा, परंपरा आणि संविधान कलम १३ (३) (अ) विरुद्ध आदिवासींवर यूसीसी समान नागरी कायदा लागू करू नये, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले.

या मोर्चात आदिवासी मंच नागपूर, वर्धा जिल्हा, अ. भा. आदिवासी विकास परिषद, अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी महासंघ, बिरसा क्रांती दल, क्रांतिवीर श्यामदादा आदिम कोलाम परिवर्तन संघटना, हलबा हलबी आदिवासी महासंघ, आदिवासी कृती समिती, पीपल्स फेडरेशन ऑफ इंडिया, बिरसा ब्रिगेड, आदिवासी काँग्रेस, बिरसा ब्रिगेड, आदिम कोलाम परिवर्तन संघटना, बिरसा ब्रिगेड, आदिवासी काँग्रेस, आदिम कोलाम परिवर्तन संघटना, मागासवर्गीय शिवसेना संघटना, राष्ट्रीय गोंडवाना पक्ष, आदिवासी जनकल्याण बहु. संस्था, शहीद अशोक गेडाम स्मारक समिती देवळी, आदिवासी महिला बचत गट व क्रांतिसूर्य बहू. महिला समिती पदाधिकारी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.