हिंगणघाटचे आ. कुणावार दुसऱ्यांदा विधानसभा तालिका अध्यक्षपदी

हिंगणघाट/प्रतिनिधी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिंगणघाट मतदार संघाचे आ. समीर कुणावार यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड केली. या निवडीमुळे वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. दुसर्यांदा आ. कुणावार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने मतदार संघात आनंदाचे वातावरण आहे. वर्धेचे तत्कालीन दिवंगत आ. प्रमोदशेंडे यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून विधान मंडळाचे कामकाज करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या नंतर विधानसभा तालिका अध्यक्ष हा बहुमान मिळाल्या असून नागपूर अधिवेशनात आ. कुणावार यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत जास्तीत जास्त कामकाज त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

विक्रमी सलग सात तास सभागृहाचे कामकाज चालविण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर असून त्या कामगिरी बद्दल विधानसभा अध्यक्षांनी सभागृहामध्ये आ. कुणावार यांचे कौतुक केले होते. त्यांच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील विक्रमी कामकाजाची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी निवड केली.

आ. कुणावार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारी आमदारांचे आभार मानले. असून सभागृहाच्या तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज करताना लोकप्रतिनिधींच्या मतदार संघातील न्याय उचित मागण्यांना सभागृहा समोर मांडण्याचे सौभाग्य मिळणार असून निश्चितच दिलेल्या संधीचे सदुपयोग करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. कुणावार म्हणाले. विधानसभेत तालिका अध्यक्षाला महत्त्वाचे स्थान आणि बहुमान असल्याने आ. कुणावार यांनी त्यांच्या मतदार संघाच उत्तम नेतृत्व केल्याने व त्यांच्या राजकीय अनुभव लक्षात घेऊन त्यांना संधी दिल्याचे सांगण्यात आले.