हवामान खात्याचा अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्ट!

वर्धा/प्रतिनिधी पुढील सात दिवस विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या नागपूर येथील वेधशाळेने वर्तविली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत नैसर्गिक आपत्ती ओढावली होती, तर यंदा जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विशेष नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हवामान खात्याच्या अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्टवर आले असून नदी काठावरील गावांवर विशेष वॉच ठेवला जात आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत पूरस्थिती ओढावली होती. त्यावेळी नदी काठावरील अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते, तर आता पुढील सात दिवस वर्ध्यासह संपूर्ण विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत आठही तालुका प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.