राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या स्थगितीवर आज सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे लक्ष

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात आज म्हणजे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर उद्या केस लिस्ट आहे. सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींर्ना कोर्टात स्थगिती देण्यात आली आहे. आता मंगळवारी ही स्थगिती उठणार की कायम राहणार याची उत्सुकता आहे. या आधी न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासमोर ही केस सुरू होती. पण ते निवृत्त झाल्यानंतर आता ही केस सरन्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आली आहे. राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबतचा घोळ गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून असल्याचं दिसून येतंय. राज्यात महाविकास आघाडी सरकरा सत्तेत आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ सदस्यांची यादी पाठवली. पण राज्यपालांकडून या यादीला ना हिरवा कंदील देण्यात आला, ना यादी मंजूर करण्याबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलं.

या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही १२ आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या १२ सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे सरकारकडून नवीन यादी सादर करण्याची तयारी सुरू झाली. या १२ नावांसाठी दोन्हीकडून जोरदार लॅाबिंग सुरु असल्याची चर्चा आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न शिंदे आणि फडणवीस यांच्यासमोर आहे.

२०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसंच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विेशास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण लॅाबिंग करत आहेत. राज्यात सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल झाली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं म्हणत याबाबत कोर्टात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता त्यावर काय निर्णय होतो हे मंगळवारी समजेल. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवारांची एन्ट्री झाल्याने ते याप्रश्नी काय भूमिका घेतात तेदेखील महत्त्वाचं आहे. या १२ सदस्यांपैकी त्यांच्या गटाला किती संधी मिळणार हेही पाहावं लागेल.