संघ संस्कारामुळे कार्याची ऊर्जा- संजय गाते

पुलगाव/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करीत असताना संघटन उभे करण्याचे बाळकडू आपोआप मिळते. त्यामुळे संपर्कातील व्यक्तीला संघटनेच्या प्रवाहात जोडता येते. जोडलेल्या व्यक्तीला दायित्वाच्या माध्यमातून समोर करणे व संघटन वाढविणे, यामुळे कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन नवनियुक्त भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी केले. नियुक्तीनंतर प्रथम नगर आगमनानिमित्त रविवार ९ रोजी शहरात त्यांचे दणदणीत स्वागत करण्यात आले.

यावेळी झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात संजय गाते बोलत होते. देशात ओबीसी समाजाला न्याय देण्याचे कार्य केवळ भाजपा शासनकाळात झाले. ३५३ समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणे हे कोणत्याही जाती किंवा समाजाच्या विरुद्ध काम नसुन वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आहे. “पथ का अंतिम लक्ष नही है, सिंहासन चढते जाना, सब समाज को लिये साथ मे आगे है, बढते जाना’ या संस्कारातून आल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना संघटनेशी जोडण्याचे मोठे दायित्व आहे. “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ या भावनेने अनेक संघर्षांना तोंड देत कार्य करीत राहिल्याने पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

अभाविप व संघ कार्यातील अनुभवाच्या शिदोरीवर हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलवेल व महाराष्ट्रात भाजपा ओबीसी मोर्चा आघाडीचे कार्य सर्वात आघाडीवर ठेवील, असे ते सत्काराला उत्तर देताना म्हणाले. पुलगाव स्टेशनवर मुंबई हावडा एक्सप्रेस ने आगमन झाल्यावर ढोल नगाराच्या निनादात मोठ्या संख्येने विदर्भातून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे, जेष्ठ नेते गुंडू कावळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजीव बतरा, ओबीसी मोर्चा पुर्व विदर्भ प्रमुख रविंद्र चव्हाण, जिल्ह्यातील, तालुक्यातील व नगरातील भाजपा व विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संजय गाते यांचे मार्गात विविध संघटना, व्यापारी, नागरिक यांनी उत्फुर्त स्वागत केले. मार्गात ठिक ठिकाणी सुहासिनींनी ओवाळले. ठिक ठिकाणी मिठाई वाटण्यात आली.मार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. मिरवणूक गाते यांच्या घरी पोहोचल्यावर सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रदेश सचिव राजेश बकाने, महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष संजय जोरवे, माजी खा. सुरेश वाघमारे यांनी संबोधित केले. प्रास्ताविक शहर अध्यक्ष नितीन बडगे तर संचालन मंगेश झाडे यांनी केले.