आयआयएमच्यावतीने बचतगटांच्या महिलांना मार्केटिंग प्रशिक्षण

वर्धा/प्रतिनिधी बचतगटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी मिळावी व त्याचबरोबर वस्तूची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पा ेहचविण्याकरीता आवश्यक कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे. यासाठी नागपूरच्या भारतीय प्रबंधन संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील महिला बचतगटांना नागपूर येथे दोन दिवशीय व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग व ब्राडींगचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा परिषद, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा व जिल्हा मिशन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयआयएमचे प्रा.मुकुंद व्यास, प्रा. गुंजन तोमर, निकुंज जैन, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या स्वाती वानखेडे, मनीष कावडे, रुपेश रामगडे आदी उपस्थित होते. बचतगटातील महिलांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या प्रशिक्षणाचा पुरेपुर फायदा करुन घ्यावा.

उत्तम मार्केटिंग तंत्र आत्मसात करावे, असे प्रतिपादन रोहन घुगे यांनी उद्घाटनपर भाषणात केले. प्रा. मुकुंद व्यास यांनी महिलांनी त्यांना येत असलेल्या अडचणींचे संबंधित प्रशिक्षकाकडून निरसन करुन घेण्याबाबत सुचित केले. गुंजन तोमर यांनी महिलांनी आपल्या व्यवसायाचे उत्तमप्रकारे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रंजिता यांनी उत्पादित वस्तुचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग प्रभावीपणे कसे करावे याबाबत तर निकुज जैन यांनी व्यवसायाची पुरवठा साखळी निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्ह्यात जवळपास १४ हजार महिला बचतगट कार्यरत आहेत. या गटांमार्फत वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात येते. यामध्ये खाद्यपदार्थ, घरगुती वापराच्या वस्तू, उन्हाळी खाद्यपदार्थ, विविध सेंद्रीय उत्पादने घेतली जातात.

यामध्ये १०० पेक्षा जास्त वस्तुंचे उत्पादन समाविष्ठ आहे. त्यापैकी अनेक वस्तूंची विक्री मेझॅान, फ्लिपकार्ट यासारख्या मोठ्या ई-कॅामर्स कंपनीच्या माध्यमातून सुध्दा मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित १०० प्रशिक्षणार्थ्यांना रोहन घुगे यांच्याहस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.