राम मंदिराचे महाद्वार असणार सोन्याचे!

अयोध्या/प्रतिनिधी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीरामाचे अयोध्येत भव्य मंदिर असावे, असे स्वप्न तीन दशकांपूर्वी पाहण्यात आले आणि आता अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर अखेरीस पूर्णत्वास येत आहे. या बांधकामाबाबत दररोज नवी माहिती समोर येत आहे. आता तर राममंदिराचा दरवाजा सोन्याचा असणार, अशी माहिती समोर आली आहे. हे राम मंदिर आतून कसे दिसेल, याचे ताजे फोटो अयोध्येतून प्रथमच समोर आले आहेत. श्रीरामांचे सिंहासन आणि त्यांचे द्वार सोन्याचे असावे, अशी भाविकांची इच्छा असल्याने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देवाचा दरवाजा सोन्याने मढवण्याचा ट्रस्टचा विचार आहे. भक्तांनी राम मंदिर उभारणीसाठी ४ ते ५ किलो सोने अर्पण केले आहे. राम मंदिर उभारणीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे निधी समर्पण मोहीम राबवण्यात आली होती; ज्याद्वारे देशाच्या कानाकोपर्यातील लोकांनी निधी दिला होता.