दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही, ठाकरे गटाच्या विराट मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई/प्रतिनिधी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्याविरोधात ठाकरे गट १ जुलै रोजी विराट मोर्चा आयोजित करणार आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने ताशेरे ओढले. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शिवसेना ठाकरे गट येत्या १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. गेल्या १५-२० वर्षे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशेब आता कॅग विचारणार आहे. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. दूध का दूध पानी का पानी होईल. उलटा चोर कोतवाल को दांटे असा प्रकार आहे. कॅगच्या ताशेऱ्यांवर एसआयटी लावली आहे, ती निष्पक्षपणे काम करेल, मुंबईकरांचा मुंबईकरांच्याच तिजोरीत राहायला हवा. तो कोणालाही वळवता येणार नाही. ही केवलवाणी धडपड आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने ठाकरे गटाकडून खोके दिवस तर राष्ट्रवादीकडून गद्दार दिवस साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून (शिंदे गट) स्वाभिमानी दिवस साजरा केला जात आहे.