खाद्य तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता चांगलीच होरपळून निघाली आहे. यामध्ये खाद्य तेल, स्वयंपाकाचा गॅस, डाळी, पेट्रोलडिझेल या जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. पण आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण खाद्या तेलावरील आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं सर्व प्रकारच्या खाद्य तेलांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. सरकारनं रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सुर्यफूल तेलावर आयात शुल्क १७.५ टक्क्यांनी घटवून १२.५ टक्के केलं आहे. आजपासूनच (१५ जून) हा बदल लागू होणार आहे.

त्याचबरोबर आता सर्व प्रकारचे कच्चे तेल म्हणजेच कच्चे पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावर ५ टक्के आयात शुल्क लागेल म्हणजेच एकूण ५.५ टक्के कर लागेल. रिफाइंड खाद्य तेलाच्या प्रकरणात प्रभावी आयात शुल्क १३.७५ टक्के, रिफाईंड तेलावर १२.५ टक्के आयात शुल्क आणि या आयात शुल्कावर १० टक्के उपकर लागणार आहे. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीवी मेहता यांनी मिंटशी बोलताना सांगितलं की, खाद्य तेलाच्या किंमतींना नियंत्रित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कच्चे आणि रिफाइंड सोयाबिन तेल, सुर्यफूल तेल यांमध्ये कमीत शुल्क असल्यानं रिफाईंड सोयाबिन तेल आणि सुर्यफूल तेल आयात करणं हे व्यावसायिक रुपानं व्यवहार्य नाही.