हिंगणघाट येथे अवैध वाळूसाठ्यावर धाड, २०० ब्रास साठा जप्त

वर्धा/प्रतिनिधी हिंगणघाट येथे मोहता मील परिसरात अवैधपणे साठवलेल्या वाळू साठ्यावर धाड टाकून २०० ब्रास साठा जप्त करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना साठ्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने धाडीची कारवाई केली. सर्व साठा जप्त करुन तहसिलदाराच्या ताब्यात देण्यात आला आहे. यातील दोषीं व्यक्तींर्विरुध्द गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. मोहता मील परिसरात अवैधपणे वाळूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना आज दुपारी प्राप्त झाली होती. माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकास हिंगणघाट येथे जावून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नरेंद्र फुलझेले व त्यांच्या पथकातील नायब तहसिलदार अतुल रासपायले, अव्वल कारकुन अमोल उगेवार यांनी तातडीने ही कारवाई पुर्ण केली.

हिंगणघाट येथे पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसिलदार सतिश मासाळ यांना कारवाईत सहभागी करुन घेण्यात आले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे पथक मील परिसरात पोहोचल्यानंतर तेथे ठिकठिकाणी अवैधपणे वाळू साठविल्याचे आढळून आले. हा सर्व साठा जप्त करण्यात आला. जप्त साठा हिंगणघाट तहसिलदार सतिश मासाळ यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वाळूचा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. असे असले तरी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली जात आहे.

शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे नोंदणी करुन लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन दिली जात आहे. जप्त करण्यात आलेला हा वाळू साठा नोंदणी केलेल्या व प्रतिक्षा यादीत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे. वाळू साठा करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई करण्याची सुचना देखील करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.