“मोदी सरकारची नऊ वर्षांतील कामे हाच २०२४ च्या यशाचा पासपोर्ट’

वर्धा/प्रतिनिधी इव्हेंट प्रिय म्हटल्या जाणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाची नऊ वर्षे एक सुसंधी ठरली आहे. सुसंधीचा उत्सव महा जनसंपर्क अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने इथे संयुक्त मोर्चा अभियानास सुरुवात झाली. एक स्कॉलर व्यक्तिमत्व म्हणून ओळख दिल्या जाणारे मध्यप्रदेशचे सहकार मंत्री डॉ. अरविंद भदोरिया, तसेच राज्यसभा खासदार राम मोकारिया यांची मार्गदर्शनासाठी उपस्थिती होती. प्रथम या कट्टर भाजपा नेत्यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीस भेट देत अभिवादन केले.

पदाधिकाऱ्यांच्या सभेत त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. ही माहिती प्रत्येक नागरिकास समजावून सांगण्याचे आवाहन त्यांनी केले. या अनुषंगाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. सरकारी योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्याचे प्रयत्न करावे. तीच आपल्या पुढील यशाची खात्री ठरणार, असा सल्ला या नेत्यांनी दिला. अभियानाचे क्लस्टर प्रमुख खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, लोकसभा प्रभारी सुमित वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार प्रताप अडसड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.