सालफळच्या रेतीघाटावर वाळु माफियांचा दरोडा

वर्धा/प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील सालफळच्या वाळु घाटातून काढलेली वाळू रोहणा येथील डेपोत जमा करावयाची आहे. तसे होत नसून घाटातून काढलेली वाळू थेट माफीया सांगेल त्या ठिकाणावर पोहचविल्या जात आहे. वाळु चोरण्याकरीता चार ट्रक आले, वाळु भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर तलाठी, सरपंच, पोलिस पाटील व इतरांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा ट्रक रिकामे करुन शासकीय जागेत उभे करण्यात आले. ही माहिती एसडीओ यांना देण्यात आली. ट्रक खाली असल्यामुळे ते सोडण्यात आले. या प्रकाराने वाळु चोरीला आशीर्वाद मिळु लागला आहे. आर्वी तालुक्यातील सालफळ, दिघी, वडगांव या वाळुघाटांचा लिलाव करण्यात आला. येथून काढण्यात आलेली वाळु रोहणा येथील डेपोत जमा करावयाची आहे. तेथून ती वाळु मागणीनुसार शासकीय दरात ग्राहकांना पुरविण्यात येणार आहे. रोहणा वाळु डेपोत अपेक्षित वाळुसाठा नाही. मग सालफळच्या घाटातून निघालेली वाळु गेली कुठे? हा प्रश्न कायम आहे.

शासनाच्या वाळु धोरणानुसार वाळुघाट लिलाव प्रक्रिया सन २०२२-२३ अंतर्गत रोहणा येथील स.न.१२१ आराजी २.४३ हे.आर. या डेपोकरीता तीन घाटातील वाळु उपसण्यात येणार आहे. याबाबतची अनुमती साई ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रो.प्रा. रविंद्र भानुदास चिखलकर रा. वल्लभनगर, गुंजखेडा पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांना देण्यात आली आहे. नियमानुसार घाटातील वाळु काढण्यात येत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. घाटातून अवैधरित्या उत्खनन व वाहतूक होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. घाटातून काढलेली वाळु ही डेपोमध्ये जात नाही. त्यामुळे डेपोत वाळुचा साठा नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करतात. आर्वी तालुक्याकरीता रोहणा हा वाळु डेपो आहे व सालफळ, दिघी, वडगांव या घाटांवर नियंत्रण ठेवण्याकरीता सोरटा येथील तलाठी, कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 ८ जुनच्या पहाटे दरम्यान वाळु चोरण्याकरीता चोरटे एकत्रित आले. त्यांनी वाळुघाटावर ठिय्या मांडला ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी तलाठी, सरपंच, पोलिस पाटील यांना दुरध्वनीवरुन माहिती दिली. ते सर्व एकत्रित येईपर्यंत चोरट्यांनी ट्रकात वाळु भरली व चोरुन नेण्याचा प्रयत्न चालु ठेवला. दरम्यान विरुळ येथील बसस्थानकावर वाळुमाफीयांचे हस्तक कार्यरत होते. त्यांनी तलाठी घाटावर येत आहे अशी माहिती पुरविली. कारवाईपासून वाचण्याकरीता ट्रकात भरलेली वाळु खाली करण्यात आली. रिकामे असलेले ट्रक शासकीय जागेत उभे करुन ठेवण्यात आले. तलाठी व इतर मंडळी पोहचली तेव्हा त्यांना ट्रक रिकामे आढळले. या ट्रकांचे छायाचित्र काढून एसडीओ यांना पाठविण्यात आले.

ट्रक रिकामे असल्यामुळे एसडीओ यांनीते ट्रक सोडून देण्यास सांगितले, जे ट्रक सोडण्यात आले ते ट्रकसालफळ, मार्डा, पुलगांव येथीलचव्यक्तीचे असल्याचे सांगण्यात येते.सरपंच सुरज कदम यांना विचारणाकेली असता मला रात्री हे ट्रक खाजगी जागेवर आढळले. ते मी अडविले असे सांगत होते. घाटात ट्रक सापडले पण कारवाई का झाली नाही? हा प्रश्नकायम आहे.

घाट सुरु झाल्याची ग्रामपंचायतला नोंद नाही

सालफळ येथील वर्धा नदीवरील वाळुघाट शासनाच्या नविन धोरणानुसार सुरु होऊन १० ते १२ दिवसांचा कालावधी लोटला.घाट मालकाने घाट सुरु झाल्याची ग्रामपंचायत कार्यालयात अद्यापही नोंद केलेली नाही असे सरपंच सुरज कदम यांनी सांगितले.

ट्रॅक्टरची वाहतूक लोकवस्तीतून

घाटातील वाळु घेऊन जाणारे ट्रॅक्टर सालफळ गावातील रस्त्यांवरुन धावतात. अगोदरच हे रस्ते कमकुवत आहेत. जड वाहनांच्या आवागमनाने ते पुन्हा खराब होणार आहे. गावातील लहान मुले रस्त्यांवर खेळतात. वेगात धावणारी ही वाहने सतत अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यांची वाहतूक वेगळ्या मार्गावरुन करणे अत्यावश्यक झाले आहे. त्या संदर्भात कोणतीही उपाययोजना घाटमालकाने केलेली दिसत नाही.

अटी व शर्तींकडे दुर्लक्ष

नव्या वाळु धोरणानुसार वाळुचा उपसा करणे, वाळुची वाहतूक करणे, वाळुचा साठा करणे या संदर्भात नियमावली आहे. या नियमावलीनुसार कोणतेच काम घाटात व डेपोवर होत नसल्याची ओरड आहे. घाटावरील कारभारावर नियंत्रण ठेवण्याकरीता नियुक्त केलेली मंडळी येथे दिसत नाही असे ग्रामस्थ सांगतात. हा सर्व प्रकार पाहता घाटासंदर्भात असलेल्या अटी व शर्तींकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.