जिल्हाधिकाऱ्यांची आष्टी तालुक्यात विविध ठिकाणी भेट व चर्चा

वर्धा/प्रतिनिधी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल आष्टी तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या व पाहणी केली. रोपवाटीका तळेगाव येथे मंजूर झालेले सिट्रस ईस्टेट व आष्टी येथे हुतात्मा स्मारक व हुतात्मा महाविद्यालयास त्यांनी भेट दिली. तळेगाव येथे सिट्रस इस्टेटची जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी पाहणी केली. या सिट्रस इस्टेट मध्ये होऊ घातलेल्या नवीन आराखड्याप्रमाणे प्रस्तावित कामे व त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी व त्याच्या उपाययोजना याबाबतीत त्यांनी जाणून घेतले. यादरम्यान तालुका कृषी अधिकारी दिगंबर साळे उपस्थित होते.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी शहरामधील ह ुतात्मा स्मारक व हुतात्मा महाविद्यालय या ठिकाणी भेट दिली. हुतात्मा स्मारकाचे संस्थेचे अध्यक्ष भरत वंजारा आणि प्राचार्य बालपांडे यांनी जिल्हाधिकारी श्री.कर्डिले यांचे स्वागत केले. आष्टी येथील ऐतिहासिक भुमीत १९४२ दरम्यान झालेल्या क्रांतिकारी घटनेबाबत एक चित्रफित जिल्हाधिकारी यांना दाखवण्यात आली. आष्टी येथे प्रस्तावित हुतात्मा स्मारकाच्या आराखडाबाबत देखील अडीअडचणी व योजना याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व दौऱ्यादरम्यान उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक आणि तहसीलदार सचिन कुमावत हे उपस्थित होते.