प्रत्येक निर्णयामागे लोकांचे जीवनमान उंचावण्याची प्रेरणा- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी मोदी सरकारला सत्तास्थापनेपासून ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी सांगितले की, त्यांचा प्रत्येक निर्णय लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, आज आपण देशसेवेला ९ वर्षे पूर्ण करत आहोत. मी कृतज्ञ आणि आभारी आहे. घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे, प्रत्येक पावलामागे लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्य करत आलो आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू. सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने विविध जनसंपर्क कार्यक्रमांच्या माध्यमातून मंगळवारपासून महिनाभर प्रचाराचे नियोजन केले आहे.                                                  पंतप्रधान मोदी बुधवारी राजस्थानमधील अजमेर येथे सभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सत्तेला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरातील उपलब्धींवर प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या उंचीपासून ते राष्ट्रीय सुरक्षेवर भर, गरिबांसाठी घरे आणि शौचालये यासारख्या कल्याणकारी उपाययोजना, पाईपद्वारे पाणी पुरवठ्याला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा विकास आणि उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न, त्या उपक्रमांचा उल्लेख भाजप नेत्यांनी देशातील प्रत्येक राज्यात पत्रकार परिषदा आयोजित करून केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपच्या विचारधारेशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यात जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू करणे यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि म्हटले की, जनतेच्या आकांक्षांच्या आधारे सरकारने ९ वर्षे पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर मोदींनी ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतली. भाजपने लोकसभेच्या ५४३ पैकी ३०३ जागा जिंकल्या होत्या.