वैदर्भियांनो सावधान! पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाचा मारा

नागपूर/प्रतिनिधी राज्यातील अनेक भागाला सोमवारी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले, पण पावसाचा कहर थांबलेला नाही. तर आणखी दोन दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील तापमान गेल्या १५ दिवसात ४५ अंश सेल्सिअस आणि आता ४० ते ४२ अंशादरम्यान असताना बहूतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात गारपिट देखील झाली. सोमवारी नागपूर शहरातही अवघ्या तासाभरात वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने झोडपले. यात शहरातील मोठमोठे वृक्ष, विजेचे खांब कोसळले. तर एमआयडीसी परिसरात चक्क ट्रक पलटी झाले. सोमवारी पुण्यात देखील असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. नागपूरच नाही तर मुंबईसह कोकण पट्ट्यावरही आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील.