“कर्नाटकमध्ये १३६ जिंकल्या, मध्य प्रदेशात १५० जागा जिंकू’, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली/प्रतिनिधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काँग्रेसची नजर आता मध्य प्रदेश आणि राजस्थान निवडणुकीकडे आहे. मध्य प्रदेशात पक्षाला १५० जागा मिळतील असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या प्रश्नावर त्यांनी काहीही बोलणे टाळले. या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षाने तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खर्गे यांनी पक्षाच्या प्रदेश युनिटच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राहुल गांधी आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपालही उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात जे झाले, त्याचीच पुनरावृत्ती मध्य प्रदेशात होईल असा दावा केला आहे. ते म्हणाले, बैठकीत आमची दीर्घ चर्चा झाली. आमचे अंतर्गत मूल्यांकन आहे की, कर्नाटकात १३६ जागा मिळाल्या, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात १५० जागा मिळतील. यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत विचारले असता ते उत्तर न देता निघून गेले. पत्रकारांनी त्यांना विचारले की, यावेळीही कमलनाथ हे मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? त्यावर राहुल गांधी म्हणाले, भाऊ, १५० जागा येणार आहेत. मुख्यमंत्री उमेदवाराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता ते तेथून निघून गेले. यावेळी त्यांच्यासोबत कमलनाथही उपस्थित होते.