बारावीत हिंगणघाटची लक्ष्मी जिल्ह्यात पहिली

वर्धा/प्रतिनिधी उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल गुरुवार २५ रोजी जाहीर झाला. यात जिल्ह्यात १६ हजार ३२ पैकी १३ हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची सरासरी ८४.५१ टक्के आहे. आठही तालुक्यात गेल्या तीन वर्षाप्रमाणे आष्टी तालुक्याने ९४.८८ टक्के निकाल देत अव्वल स्थान पटकावले. तर निकालात सर्वाधिक माघारलेला तालुका म्हणून कारंजा तालुका पुढे आला आहे. या तालुक्याचानिकाल ७२.७९ टक्के आहे. सन २०२० मध्ये वर्धा जिल्ह्याचा निकाल ८०.५२ टक्के होता. २०२१ मध्ये त्यात वाढ होऊन ८७.४० टक्के, २०२२ मध्ये ९५.३७ टक्के निकाल लागला होता तर यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हा माघारला असून ८४.५१ टक्के निकाल लागला. हिंगणघाट येथील महेश ज्ञानपीठ महाविद्यालयातील लक्ष्मी सुरेश गजराणी या विद्यार्थिनीने ९६.३३ टक्के गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर तेथीलच होलीफेथ वाणिज्यची तृप्ती मातुरे ९५.६७ टक्के घेऊन जिल्ह्यात द्वितीय तर न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा येथील विज्ञान शाखेचा सोहम कोल्हटकर व हिंगणघाट येथील जीबीएमची विद्यार्थिनी केतकी शिंगोटे ९४.५० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात तृतीय ठरले.

जिल्ह्यात ८ हजार ८१४३ विद्यार्थ्यांनी तर ७ हजार ८८९ विद्यार्थिनी असे एकूण १६ हजार ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ हजार ५२४ विद्यार्थी तर ७ हजार २५ विद्यार्थिनी असे एकूण १३ हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८०.११ टक्के मुलं तर ८९.०४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. जिल्ह्यात परीक्षेकरिता १६ हजार १२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परीक्षेकरिता १६ हजार ३२ विद्यार्थी पात्र ठरले. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९३.४१ टक्के, कला शाखेचा निकाल ७१.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८८.६३ टक्के तर व्होकेशनल शाखेचा निकाल ८१.८७ टक्के लागला आहे. येथील अनेक महाविद्यालयाने खाजगी शिकवणी वर्गाला मोकळे रान करून दिल्याने महाविद्यालय आता फक्त प्रवेशापुर्तेच मर्यादीत झाले आहेत.                                    अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी वर्षही भर महाविद्यालयाचे तोंड पाहत नाहीत. परीक्षेलाही शिकवणी वर्गवालेच घेऊन जातात. त्यामुळेच महाविद्यालयाचा निकाल घसरला आहे. त्याची कोणत्याही शिक्षण संस्थेच्या संचालकांना तमा असल्याचे दिसून येत नाही. २०१७ मध्ये बारावीचा निकाल ८५.२७ टक्के होता. त्यात घसरण होऊन २०१८ मध्ये तो निकाल ८२.६८ टक्क्यांवर आला होता. २०१९ मध्ये ८०. ५२ निकाल लागला होता.

तालुकानिहाय निकाल वर्धा : ८९.९६ टक्के, आर्वी : ७२.४३ टक्के आष्टी : ९४.८८ टक्के, देवळी : ८७.३४ टक्के हिंगणघाट :८२.३३ टक्के, कारंजा : ७२.७९ टक्के समुद्रपूर :८२.८० टक्के, सेलू :७६.९५ टक्के