लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- विनायक महामुनी

वर्धा/प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी कालमर्यादेत विविध प्रकारच्या शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संपुर्ण राज्यभर शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व तालुका ठिकाणी या अभियानांतर्गत विशेष शिबिरे घेतले जात असून देवळी येथे आयोजित शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी यांच्याहस्ते झाले. यावेळी देवळीचे तहसीलदार सचिन यादव, महिला बाल कल्याण अधिकारी अश्विनी कुंभार, तालुका आरोग्य अधिकारी मामिलवार, नायब तहसीलदार डॉ एस.पाराजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.                                      शासन आपल्या दारी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर संयुक्तपणे आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्व शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, निवडणूक विभागाचे स्टॉल होते तसेच अन्य विभागामार्फत स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी निराधार योजनेच्या १५ लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे आदेश देण्यात आले. १५ लाभार्थ्यांना रेशनकार्ड तसेच देवळी तालुक्यातील १ हजार २३ सातबाराचे पुनर्वसनचे शेरे कमी केल्याचे सातबारा पैकी १० चे वाटप करण्यात आले. यावेळी नवनियुक्त ९ कोतवालांपैकी ७ कोतवालांना नियुकी आदेश देण्यात आले. यावेळी विनायक महामुनी या ंनी महिला ंसह सवर् सामान्य नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा तसेच आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

तहसीलदार सचिन यादव यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आरोग्य विभागाद्वारे महिलांकरिता तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ६५४ लाभार्थ्यांनी शिबिरास भेट दिली. शिबिरात एकूण १८५ तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ११९ अर्जाचे तत्काळ निराकरण करण्यात आले. उर्वरित ६६ तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागास पाठवण्यात आले आहे.