बारावीचा निकाल उद्या, लगेचच श्रेणीसुधार परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

पुणे/प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि सीआयएससीईने दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल एकाच दिवशी जाहीर केले होते. त्यानंतर राज्य मंडळ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार या कडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केलीआहे.

त्या बाबतची माहिती राज्य मंडळाने जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी, तसेच आपली श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची आणखी एक संधी दिली जाते. त्यानुसार जुलै-ऑगस्टमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची श्रेणीसुधार परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ मे पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. यंदा ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती.