अकोला प्रकरण…१४८ दंगलखोरांना अटक

अकोला/प्रतिनिधी इंस्टाग्राम आणि इतर समाजमाध्यमांवर विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात शनिवार, १३ मे रोजी देण्यात आली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, त्यानंतर शहरातील विविध भागात घरात शिरून मालमत्तेचे नुकसान आणि सामान्य नागरिकांसह पोलिसांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत हरिहरपेठ येथील विलास गायकवाड याचा मृत्यू झाला. या दंगलीला कारणीभूत असलेल्या प्रमुख दोघांसह १४८ दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती शनिवार, २० मे रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत उपस्थित होत्या. इंस्टाग्राम वरील दोघांमध्ये झालेले संभाषण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्या, अशी तक्रार करण्यासाठी मोठा जमाव रामदासपेठ पोलिस ठाण्यासमोर एकत्र आला. या जमावाने जुने शहर परिसरातील हरिहरपेठ, पोळा चौक आणि इतर ठिकाणी जाळपोळ व दगडफेक केली. सामान्य नागरिकांच्या घरात शिरले. शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे मोठेनुकसान केले. तर लोखंडी पाईप व काठ्यांनी नागरिक व पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीत हरिहरपेठ येथील विलास गायकवाड याचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यात ६ अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे आढळले. रामदासपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार आणि आणखी एका जणात मोबाईलवर संभाषण झाले. ते संभाषण समाजमाध्यमांवर प्रसारित केले गेले. खोटी माहिती प्रसारित करून कट रचूून विविध समाजाच्या लोकांना एकत्र बोलवून दंगल घडविण्यात आली. या गुन्ह्यात ४४ जणांना अटक करण्यात आली. दंगलीप्रकरणी दोषी असणार्या एकूण १४८ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी सखोल तपास करण्यात येणार असून, दंगलीला कारणीभूत असलेल्यांना कठोर शासन करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दंगल घडविणारे मुख्य सूत्रधार लवकरच अटकेत असतील, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. नागरिकांनी नियमित व्यवहार करावे शहरात सर्वत्र शांतता व सुव्यवस्था आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त असून जिल्हा पोलिस दलासह चार राज्य राखीव दलाच्या तुकड्या तर शिघ्र प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्या शहरात तैनात आहेत. यासह आवश्यक तेथे विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था कायम राखत नियमित व्यवहार सुरूळीत करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी केले.