जिल्हा मध्यवर्ती व ४५ महिन्याचे वेतन; कर्मचारी उन्हात

वर्धा/प्रतिनिधी वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दिवाळे, वेळा साखर कारखाना, बापुरावजी देशमुख सूत गिरणी डबघाईस येणे आणि आता ४५ महिन्याच्या वेतनासाठी २६ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे उन्हातान्हात उपोषण सुरू आहे. एकंदरीत राजकीय दृष्ट्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीही हातची गेली. यशवन्त ग्रामीण शिक्षण संस्थाही प्राणवायु राहिली आहे. राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेले समीर देशमुख यांनी मात्र राजकीय महत्वाकांक्षा ठेवत वडिलांचा अमृत महोत्सव आयोजित केला. त्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचऱ्याना आर्थिक वेठीसही धरले. राजकीय नेत्यांनीही सढळ हाताने मदत उभी केली. ज्या परिसरात कार्यक्रम होतो आहे ती इमारत विद्युत रोषणाईने सजली.

दुसरीकडे ज्या जिल्हा मध्यवर्तीने नावारूपास आणले ती इमारत आणि तेथील कर्मचारी, बँकेत करोडो रुपयांची ठेवी ठेवणारे बिचारे ठेवीदार रडकुंडीला आलेले आहेत. ४५ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी २६ दिवसापासून आंदोलन पुकारले आहे. प्रशासन व व्यवस्थापनाने अतिशय निर्दयीपणे असवंदशिलनतेचा कळस गाठला असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.समीर देशमुख यांच्या कार्यकाळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पार डब्बा वाजला. या बँकेने त्यांच्याच वेळा साखर कारखाना, सूतगिरणीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले ती वसुली न झाल्याने बँक डबघाईस आली आणि जिल्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. यात अनेकांच्या लेकीच्या लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले शेकडो कर्मचारी रस्त्यावर आले. या परिवाराच्या अखत्यारीत २२ शाळा, ११ ज्युनिअर कॉलेज, ५ सिनिअर कॉलेज, शेवटचा घटका मोजत असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय एवढा गराडा आहे.

माजी आमदार सुरेश देशमुख यांनी मितभाषी स्वभावाने वर्धेकरांचे प्रेम मिळवले. त्याच्या प्रेमात सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाची मोट बांधली. मात्र, त्याची धुरा समीर देशमुख यांनी स्वतः कडे ठेवली आणि तेथूनच वर्धेकर आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यातूनच गेल्या आठवड्यात झालेल्या व्याख्यानाकडे अनेकांनी पाठ फिरवली असतानाच अमृत महोत्सवासाठी राजकीय व्यक्तींर्नी दिलदार होत लाखोंची मदत केली असताना विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालकीच्या शाळा कॉलेजच्या प्राचार्य व वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक यांच्याकडून प्रत्येकी १५ हजार, प्राचार्य व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक प्रति १० हजार, मुख्याध्यापक व हायस्कूल शिक्षक प्रत्येकी ८ हजार, मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक प्रत्येकी ५ हजार, लिपिक ४ हजार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी २ हजार, निवृत्त प्राध्यापक कडून ८ हजार तर निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १ हजार रुपये महोत्सवाकरिता जमा करण्यात आले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेची तिकीट मिळवत देवळी मतदार संघात तिसऱ्या क्रमांकाची मत समीर देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्ष ते कोणत्याच पक्षाचे नेते नव्हते. शरद पवार यांच्या उपस्थितीत वर्धेत त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हुकला होता. त्यानंतर मुंबईत ते स्वगृही परतले. आजच्या महोत्सवाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न होणार असला तरी मध्यवर्ती बँक डबघाईस आणल्याचा धब्बा पुसल्या जाणार नाही हेही तेवढेच खरे.