कंपन्यांनी वितरकांना वेळेत बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी मागील वर्षी काही सोयाबिन कंपन्याचे बियाणे उगवले नव्हते. यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कंपन्यांनी चांगल्या प्रतिचे बियाणे तसेच रायायनिक खते वितकरांना वेळेत उपलब्ध करुन द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीच्या आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, मोहिम अधिकारी एस.वाय.बमनोटे, जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक पी.ए. घायतिडक, बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी, बियाणे कंपनीचे अधिकृत विक्रेते, रासायनिक खत कंपनीचे प्रतिनिधी व विक्रेते, वखार महामंडळाचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते. रासायनिक खत कंपन्यांनी रॅक लागण्यापुर्वी कृषि विभागांना सुचना द्याव्यात जेणेकरुन तालुका स्तरावर खत पुरवठाधारकांना खत पुरवठा करण्याचे नियोजन करुन वेळेत शेतकऱ्यांना खत उपलब्ध करुन देता येईल.

तसेच शासनाने नियोजन केल्यानुसार कंपन्यानी खते व बियाण्याचे वितरण करावे, अशा सूचना श्री राहुल कर्डिले यांनी केल्या. वखार महामंडळांनी त्यांच्या गोडाऊनला प्राप्त होणारा खताचा साठा व्यवस्थित साठवणूक होईल याची व्यवस्था करावी.

शेतकऱ्यांनी दि.१५ जूननंतरच पेरणीचे नियोजन करावे

बरेचशे शेतकरी काही प्रमाणात पाऊस झाल्याबरोबरच पेरणी करतात व नंतर पावसाचा खंड झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागते किंवा उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरी १०० मीली मीटर पाऊस झाल्याशिवाय तसेच दि.१५ जुन नंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.