स.ब. जिल्हा ग्रंथालय व सृजन आयोजित गज़ल मुशायरा “जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’

वर्धा/प्रतिनिधी “हासणे हे जरी स्वभावात आहे, जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’, अशी आंतरसल व्यक्त करणारा तर कधी मनमुराद हसविणारा गज़ल मुशायरा स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात सादर झाला. सृजन साहित्य संघ आणि बजाज जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या या गज़ल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’ या गज़लसंग्रहाचे रचनाकार यवतमाळचे किरणकुमार मडावी यांनी या मुशायऱ्यात आपल्या बहारदार निवेदनाने रंगत आणली. संजय इंगळे तिगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मुशायऱ्यात एकापेक्षा एक सरस गजलरचना सादर करून गझलकारांनी रसिकांची दाद मिळविली.

जंगलाप्रती जिव्हाळा जोपासताना वनविभागात कार्यरत असलेल्या वृषाली मारतोडे मैफलीत म्हणतात, ‘होत आहे या जगाला भार जंगल, ते म्हणोनी करत आहे ठार जंगल, गुंतला पानोफुली हा जीव माझा, वाटते माझे मला घरदार जंगल.’ तर नात्यातला हळवा भाव जपत तेजस भातकुलकर म्हणतात, ‘बाळ रडले दचकुनी झोपेमधे का? स्वप्न गेल्या मायचे दिसले असावे!’ पुण्याहून आलेल्या रेणुका खटी पुरोहित यांनी छोट्या बहरातील अत्यंत सुंदर गझल सादर केली. ‘सत्य आजवर दडले का? सगळ्यांना आवडले का? रंग असा का उडलेला, फासे उलटे पडले का?’ असा प्रश्न त्यांनी गज़लेतून मांडला. आपल्या ओघवत्या भाषाशैलीतून गजल फुलवीत कांचन कानतोडे हिने ‘श्वास माझे मग भलेही आज तू घेऊन जा, फक्त माझे काय चुकले एवढे सांगून जा, काय झाले आपले जर लग्न नाही जाहले, जर कुठे जुळले तुझे तर पत्रिका देऊन जा’ असे सांगत मैफलीत हास्याची लकेर उमटवली.

शेतीमातीशी निष्ठा जपणारे आंजी येथील गज़लकार महेन महाजन म्हणाले, ‘एवढ्यासाठीच मीही बोललो नाही खरे, मी कसे द्यावे स्वतःच्या ‘मी’पणाला हादरे? सावकारा ठेव तारण… पेरण्या पण बीज दे… फाळ, नांगर, तिफण, डवरा, बैल, दावे, कासरे!’ “जीवना, दे स्थैर्य मज वणवण नको, धावण्याचे फालतू कारण नको, पामराला पायरीशी स्थान दे, विठ्ठला! कुठलेच मोठेपण नको’ हा निर्मळ भाव प्रीती तडस वाडीभस्मे यांच्या गजलेतून व्यक्त झाला. ‘पुन्हा पुन्हा लिहिण्यासाठी पाटी देतो पराभव, ताठपणाने उभे राहण्या काठी देतो पराभव, धडपडणारी इवली मुंगी सत्य सांगते जगास या, कष्टकऱ्यांना दूध दह्याची वाटी देतो पराभव’ अशी अनुभवाची गज़ल आर्वी येथील प्रकाश बनसोड यांनी सादर केली. ‘माझ्या घरी सुखाचा जेव्हा जमाव झाला, रे जीवना तुझा बस तेव्हा अभाव झाला, आजन्म पोसले मी रक्तामध्ये निखारे, तेव्हा कुठे खरे तर माझा निभाव झाला’ अशी जीवनाची विदारकता स्पष्ट करणारी गजल विद्यानंद हाडके यांनी सादर केली.

‘हासणे हे जरी स्वभावात आहे’ हे सांगताना किरणकुमार मडावी म्हणाले, ‘कोणत्या पापणीत मी तुला साठवावे, स्वप्न सारेच माझे लिलावात आहे.’ संजय इंगळे तिगावकर यांनी ‘मी पुत्र अमृताचा, ओवी अभंग माझे… छळते कशी कळेना ही गज़लियत मलाही, ना मीर ना जफर मी, गालीब ना जरी मी, माझी गज़ल तिथेही आहे जिथे इलाही’ असे गजलेतून व्यक्त होत मुशायऱ्याची सांगता केली. या गजल मुशायऱ्याला बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाचे सचिव गौरीशंकर टिबडेवाल, ज्येष्ठ कवी प्रभाकर उघडे, प्रा. सुलभा चौधरी, प्रा. पद्माकर बाविस्कर, डॉ. राजेश देशपांडे, प्राचार्य जयश्री कोटगीरवार, स ंगीता इ ंगळ े, म ंज ुषा ठाकर े चौगावकर, मीनल गिरडकर, कविता बेदरकर, प्रशांत ढोले, गोपाल चोपडे, प्रा. राकेश वाडीभस्मे, ज्योती भगत, सीमा मुळे, पल्लवी पुरोहित, डॉ. सुनीता भुरकुंडे, निशा काळे, रोहिणी लुंगे, मिलिंद भागवत, माया रंभाले, अशोक तुरकेल, गिरीश उप्पलवार, शुभांगी पोकळे, रत्ना मनवरे, दीपक गुढेकर, नंदिनी बर्वे, किशोर डंभारे, सुचिता बुधे, छाया राडे, निलंबरी सदन, नरेंद्र नागतोडे, संघर्ष डहाके, जगदीश ढुमणे, चंदू गाडगे, देवानंद पांगूळ यांच्यासह गज़लप्रेमींची उपस्थिती होती.