मुलगा उदरात असतानाच मातेने देशसेवेला देण्याचा केला निर्धार

पुलगाव/प्रतिनिधी गर्भात बाळ आणि पुढे शहीद पतीचा मृतदेह. तेव्हाचे ते शोकग्रस्त वातावरण आजही पुलगावकरांच्या डोळ्यापुढे तरळले. कारगील युद्धात हुतात्मा झालेल्या पतीची इच्छा पुर्ण करण्यासाठी मी माझ्या पोटातील लेकराला देशसेवेसाठीच पाठवीन असा निर्धार त्या मातेने केला होता. तसे मुलाला घडवले. न बघितलेल्या वडिलांचे देशसेवेचे स्वप्न आणि आईचा संकल्प शहीद पुत्राने पुर्ण केला. तो लेफ्टनंट होऊन! शहीद कृष्णा यांना दोन मुलं. ते शहीद झाले तेव्हा मोठा मुलगा कुणाल अडीच वर्षांचा तर प्रज्वल गर्भातच होता. आईने प्रज्वलला देशसेवेत पाठवण्याचा निर्धार केला होता. त्याने कठीण परिश्रम घेत लेफ्टनंट हे पद मिळविले.

तो आता डेहराडून येथे प्रशिक्षणाकरिता जाणार आहे. स्थानिक गांधीनगरातील कृष्णा समरीत कारगील युद्धात शहीद झाले. ज्यावेळी कृष्णाजी शहीद झाले तेव्हा प्रज्वल आईच्या गर्भात होता. त्यांचा मुलगा प्रज्वल (२३) याने भारतीय सेनेत लेफ्टनंट पदावर स्थान मिळविले आहे. त्याची आई सविता यांनी प्रज्वलला भारतीय सेनेमध्ये पाठविणार, अशी इच्छा व्यक्त केली होती. आईची इच्छा पूर्ण करण्याकरिता प्रज्वलने भारतीय सेनेत जाण्याकरिता परिश्रम घेतले. सतत अभ्यास करीत त्याने लेफ्टनंट हे स्थान मिळविले. प्रज्वलची वैद्यकीय चाचणी पुणे येथे झाली.

तो अखिल भारतीय श्रेणीत ६३ वा आला. तो १८ महिन्याच्या प्रशिक्षणाकरिता डेहरादून येथे जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पदावर रुजू होईल. प्रज्वलने आईचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. वसंत अतुरकर, नितीन कोठे, रवी केशरवानी, ममता निकम, रेखा केशरवाणी, वर्षा बाभळे, संजय दिघेकर, अजिंक्य धांदे, अविनाश भोपे, प्रदीप सोळंकी, चंद्रकांत शहाकार आदींनी त्याचे अभिनंदन केले.