बिहारमधून ६३ अल्पवयीन मुस्लीम मुलं महाराष्ट्रात, कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात, चौकशी सुरु

कोल्हापूर/प्रतिनिधी बिहारमधून मुस्लीम समाजातील ६३ मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पडकला आहे. ट्रकमध्ये ७ ते १४ वयोगटातील ६३ मुलं होती. ही सर्व मुस्लीम समाजातील मुलं आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेवून झडती घेतली. ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात शिक्षणासाठी आणण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आहे. ही सर्व मुलं कोल्हापुरात रेल्वेने दाखल झाली, त्यानंतर एका ट्रकमधून आजाऱ्याला जाणार होती. पण हिंदुत्ववादी संघटनानी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतलं आहे.

कोल्हापुरात ही मुलं नेमकी का आली होती? त्यांना जबरदस्ती आणण्यात आलं होतं का? त्यांना ट्रकमध्ये कोंबून का नेलं जात होतं? असे अनेक प्रश्न हिंदुत्तवादी संघटनेने उपस्थित केले असून पोलिसांनी त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक थांबवत सर्व मुलांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत खरंच मदरशात शिक्षणासाठी त्यांना नेलं जात होतं की अन्य काही कारण आहे याच तपास करत आहेत.