प्रीती वाडीभस्मे यांच्या ललितसंग्रहाला मुक्त सृजन साहित्य पुरस्कार जाहीर

वर्धा/प्रतिनिधी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ख्यातनाम मुक्त सृजन साहित्य पत्रिकेद्वारे दिला जाणारा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा कै. नारायणराव दहिफळे मुक्त सृजन ललितगद्य पुरस्कार’ प्रीती तडस वाडीभस्मे यांच्या देहदीप्तीमधील चंद्र या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात यांनी पत्रिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक लेखन, समीक्षा, संशोधन, बालसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र आदी विविध साहित्यकृतींसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली असून सदर पुरस्कार मुक्त सृजन आयोजित साहित्य संमेलनात दिले जाणार आहेत.

परीस पब्लिकेशन, पुणे प्रकाशित देहदीप्तीमधील चंद्र या ललितलेख संग्रहाला साहित्यिक संजय इंगळे तिगावकर यांची प्रस्तावना लाभली असून पाठराखण ललित लेखक रवींद्र जवादे यांची आहे. प्रीती तडस वाडीभस्मे यांना प्राप्त झालेल्या या साहित्य पुरस्कारासाठी संजय इंगळे तिगावकर, विद्यानंद हाडके, जयश्री कोटगीरवार, राकेश वाडीभस्मे, प्रशांत ढोले, प्रा. बाबाराव तडस, ज्योती भगत, महेन महाजन, कविता बेदरकर, दीपक गुढेकर, तेजस भातकुलकर, मीनल गिरडकर तसेच सृजन साहित्य संघाद्वारे अभिनंदन करण्यात आले आहे.