“रडकुंडी’ला आलेल्या टॉकीज मालकांना केरला स्टोरीचा रूमाल

वर्धा/प्रतिनिधी त्याच त्या रटाळवाण्या सिनेमांच्या कथनामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरविली आहे. मोबाईल आणि दूरदर्शनवरील चित्रपटांनी अनेक सिनेमागृह बंद पडल्याने चित्रपटगृह मालक रडकुंडीला आले आहेत. दरम्यान, धर्मपरिवर्तन कसे होते याचे वास्तव दाखवणार्या केरला स्टोरीने मात्र आधार दिला. वर्धेच्या गणेश चित्रपट गृहात ६ दिवसात ८ हजार प्रेक्षकांनी द केरल स्टोरीचा आनंद घेतल्याची माहिती चित्रपटगृह मालक युवा उद्योजक प्रदीप बजाज यांनी दिली. आजच्या परिस्थितीत प्रेक्षकांना सत्य कथा व अवतीभवती घडणार्या घटनांवर आधारित सिनेमा पाहायला आवडतो. केरला स्टोरी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याने प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आहे.

येथील गणेश सिनेमागृहात ६ दिवसांत ८ हजार लोकांनी हा सिनेमा बघितल्याची माहिती प्रदीप बजाज यांनी दिली. लव्ह जिहाद हा मुद्दाही चर्चेत आहे. हे कशातून घडते, याची कथा केरला स्टोरी सिनेमात आहे. केरला सिनेमाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत परिस्थितीचे वर्णन केले आहे. चारही शोहाऊसफुल्ल असून नागरिकांना पुढील शोचे तिकीट बुक करावे लागत आहे. काही जण एखाद्या शोची संपूर्ण तिकीटसुद्धा बुक करीत आहे.शनिवार १३ रोजी बजरंग दलाच्यावतीने ६ ते ९ याशोची संपूर्णतिकीट बुक केली. सदर तिकीट त्यांनी समूहाने वाटून दिली. तर काही प्रेक्षकसुद्धा एकाचवेळी ३० ते ४० तिकीट बुक करीत आहे. युवक-युवतींचा सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आणखीकाही दिवस हा सिनेमा हाऊसफुल्ल चालेल, असेही प्रदीप बजाजयांनी सांगितले.