राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाची आ. कुणावार यांनी केली पाहणी

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरातून जाणार्या नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कलोडे चौक तसेच उपजिल्हा रुग्णालय चौकातील उड्डाणपुलाला ना. नितीन गडकरी यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. ना. गडकरी यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांना तत्काळ निविदा प्रक्रिया पुर्ण करून लगेच या कामाला सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बुधवार १० रोजी आ. समीर कुणावार यांनी प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकार्यांशी चर्चा करून नागरिकांचेही अभिप्राय जाणून घेतले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक डॉ. अरविंद काळे, तांत्रिक व्यवस्थापक समीर परमार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ, पोलिस निरीक्षक पुंडकर आदी अधिकारी उपस्थित होते. आ. कुणावार यांनी या उड्डाणपुलाची संपूर्ण माहिती अधिकार्यांकडून जाणून घेतली.

प्रस्तावित उड्डाणपूल हा स्थानिक नंदोरी चौक उड्डाणपूल तसेच रेल्वे उड्डाणपुलाला जोडल्या जाणार असून जवळपास १ किमी पेक्षा जास्त लांबीचा उड्डाणपूल लवकरच निर्माण होणार आहे. ठराविक अंतरावर सिमेंट काँक्रीटच्या पिल्लरवर मोठे प्रिकास्ट गर्डर व स्लॅब अशा स्वरूपाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पुलाखाली वाहतुकीसाठी दोन्ही बाजूला ७ मीटर रुंदीचे सर्विस रोड अस्तित्त्वात राहणार आहे. उड्डाणपुलाखाली पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करून येथे उद्याननिर्मिती करण्यात येणार आहे. प्रस्तावित उड्डाणपूल शहराच्या मध्यभागातून जात असल्याने पुलाखालील भागाचे सुशोभीकरण तसेच सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश आ. कुणावार यांनी यावेळी प्रकल्प संचालक डॉ. अरविंद काळे यांना दिले.

उड्डाणपुलाखाली पथदिव्यांची व्यवस्था करण्यात येणार असून यामुळे परिसर प्रकाशमय होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. सदर उड्डाणपुलाच्या बांधकामाकरिता सुमारे १८० कोटी रुपयांचे बजेट सादर करण्यात आला असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या पुलाची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. अधिकार्यांनी यावेळी पुढील ३ महिन्यात पुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. आ. कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शहरातील जनतेचा हा मोठा प्रश्न सुटणार आहे. चङ- र्घीपरुरी उड्डाणपुलाच्या जागेच्या पाहणी दरम्यान भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दीघे, भाजयुमो सचिव अंकुश ठाकूर, प्रभागातील माजी नगरसेवक छाया सातपुते, रवीला आखाडे, नागरिक तसेच पत्रकारमंडळी उपस्थित होते.