भविष्यात अंतराळात युद्ध होण्याची शक्यता- हवाईदल प्रमुख

नवी दिल्ली/प्रतिनिधी आगामी काळात सैन्यांमध्ये आमने-सामने युद्ध होणार नाही. उलट युद्धाचा संपूर्ण पॅटर्न बदलेल. येणारा काळ अंतराळ युद्धाचा असेल, असा इशारा तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. अनेक विकसित देशांनी या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. दुसरीकडे, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी एक निवेदन जारी केले आहे की, भारताला आगामी काळात अत्याधुनिक शस्त्रांची गरज भासणार आहे. हवाई दल प्रमुख म्हणाले की, जगातील अनेक विकसित देश अंतराळ क्षेत्र प्रभावीपणे राबवण्यात गुंतले आहेत. त्यांच्या मते, चीनसारखे देश आयसीआर तंत्रज्ञान म्हणजेच अंतराळाच्या माध्यमातून बदला घेण्याची तयारी करत आहेत.

चीन अंतराळात तंत्रज्ञान विकसित करत आहे, हे पाहून अमेरिकाही तणावात आहे. अलीकडेच, भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी त्यांच्या चिनी समकक्षासोबत बैठक घेतली. एका परिसंवादात हवाई दलाचे प्रमुख मार्शल चौधरी म्हणाले की, भारताने मिशन शक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल केली पाहिजे. मायक्रोसॅट-आर उपग्रह नष्ट करण्यासाठी अँटी-सॅटलाइट इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. अमेरिका आणि फ्रान्सचा संदर्भ देत हवाई दलाचे प्रमुख मार्शल चौधरी म्हणाले की, भारतीय हवाई दलाला ‘एअर पॉवर’पासून ‘एरोस्पेस पॉवर’च्या दिशेने वाटचाल करावी लागेल. चीनने गेल्या काही वर्षांत आपल्या उपग्रहांची संख्या झपाट्याने वाढवली आहे. यात ७०० हून अधिक उपग्रह कार्यरत आहेत. भारताकडे अद्याप स्वतः ची एरोस्पेस यंत्रणा नसली तरी, या दिशेने काम सुरू झाले आहे.