उद्योजकांनी उद्योगाच्या वाढीसाठी योगदान द्यावे- विजय आहेर

वर्धा/प्रतिनिधी वार्षिक उद्योग पाहणी अंतर्गत उद्योगांनी माहिती देण्यासाठी सहकार्य करुन देशाच्या व राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या वाढीच्या मोजमापात योगदान द्यावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालय संचालक विजय आहेर यांनी केले. वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येत असून निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम २००८ खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक आहे, असे श्री.आहेर यांनी सांगितले.

क्षेत्रिय अधिकाऱ्यांसाठी यशदा पुणे येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कायर् शाळ ेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, यशदा प्रमुख पाहूणे म्हणून औद्योगिक सांख्यिकी विभागाच्या उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, राष्ट्रीय नमूना पाहणी विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक पी.डी. रेंदाळकर उपस्थित होते. प्रादेशिक सांख्यिकी कार्यालय, नागपूरचे सहसंचालक कृ.व.फिरके व जिल्हा सांख्यिकी कार्यालय,वर्धा उपसंचालक प्र.व.पाटील आणि क्षेत्रकाम करणारे कर्मचारी या कार्यशाळेत उपस्थित होते. एकूण १६४ अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले.

सौम्या चक्रवर्ती यांनी जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याचे सांगितले. महासंचालक चोकलिंगम यांनी देशातील सर्व्हे चा इतिहास, माहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित, अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणांसह माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसंचालक दिपाली धावरे यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. सहसंचालक नवेन्दु फिरके यांनी उपस्थितांचे आभार मानले.