जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वर्धा/प्रतिनिधी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. जनतेमध्ये हिवताप या किटकजन्य आजाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीन  या दिनाचे औचित्य साधून दि.३० एप्रिल पर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन साजरा करण्यात येत आहे. आज जागतिक हिवताप दिनानिमित्त आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा,पथनाट्य व जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत किटकजन्य आजाराविषयक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन तडस यांच्याहस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश पाठक, जिल्हा हिवताप अधिकारी जयश्री थोटे, शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य नम्रता गवई यांची प्रमुख उपथिती होती. मान्यवरांचे तुळसीचे रोप व गप्पीमासे देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ. वेदपाठक यांनी जिल्ह्यात हिवतापाची स्थिती सर्वेक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर दिला व हिवतापाच्या वर्तमान परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. तडस यांनी हिवपात उपचार, केंद्र शासनाची हिवताप विषयक भुमिका विषद केली. प्रास्ताविकात जयश्री थोटे यांनी जागतिक हिवताप दिनाचा उद्देश व महत्व सांगून डासांचे प्रकार व जैविक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गप्पीमासे यांचेपासून डासअळीवर नियंत्रण कसे मिळविता येईल, याबाबत महत्व पटवून सांगितले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी नुरुल हक शेख, शासकीय परिचारीका प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थीनी, शिक्षिका, हत्तीरोग व हिवताप कार्यालयातील अधिक्षक श्री.दापूरकर, श्री.वाघमारे, कु.भैसारे, आरोग्य सहाय्यक चंद्रकांत मुटकुळे, श्री.बरवड, एम.जे.नंदनवार, श्रीमती मानकर, अविनाश चव्हाटे, श्री.चिंचोळकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. गेडाम, कुसुमाकर राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सी.एम. मुटकुळे यांनी मानले.