पुलगाव परिसरात वादळ वाऱ्यासह गारपीट

पुलगाव/प्रतिनिधी जिल्ह्यात पुन्हा वातावरणात अचानक बदल झाला. दि. २५ एप्रिल रोजी सकाळपासुन कडाक्याचे उन्ह असताना २ वाजताच्या सुमारास आकाश काळोखून आले. २.३० वाजताच्या सुमारास शहरातील काही भागात गारांसह पाऊस झाला तर पुलगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. पुलगावच्या चहूबाजुने असलेल्या ग्रामीण भागात व शहरात दुपारी दोन पासुन वादळाला सुरवात झाली. सोसाट्याचा वारा सुटला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले. दुपारी शहरात व ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली. ग्रामीण भागात गारांसह पाऊस झाला. मलकापूर, दहेगाव, कवठा, नाचणगाव, खातखेडा, कोळोणा, घोडेगाव, सोनोरा, वाघोली, निंबोरा, गिरोली, विटाळा, चिंचोली आदी ठिकाणी गारांसह पाऊस झाला. वर्धा शहरातील काही भागात रस्ते ओले करणारा पाऊस झाला. सावंगीत वादळी वार्यासह तर कारला परिसरात गारांसह पाऊस झाला. या पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. सायंकाळपर्यंत वातावरण ढगाळ होते.