आर्वी आतबाहेर सारखेच! अजुन किती वर्ष लागणार?

आर्वी/प्रतिनिधी तळेगाव आर्वी हा मार्ग राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे गेल्यामुळे तळेगाव आर्वी महामार्गाचे काम ४ वर्षांपासून रखडल्यामुळे शहरातून शिलाराम मंगल कार्यालय ते मॉडेल हाइस्कूलपर्यंत जाणार्या उखडलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. हा महामार्ग नॅशनल हायवे झाल्यामुळे साबांवि व आर्वी नपने स्वत:ची जबाबदारी झटकली. बाजारपेठेचा एकच मार्ग असल्यामुळे वाहतुकीची वर्दळ असते. शिलाराम मंगल कार्यलय वर्धा मार्ग खोदलेला असल्यामुळे अडचणीचा झाला आहे. बस स्थानक, जिप कन्या शाळा, न्यायालय, शिवाजी चौक आदी ठिकाणी मोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालकाचा खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी उसळल्यामुळे अपघात होत आहेत. मॉडेल हायस्कूल ते गोरक्षणपर्यंतचा रस्ता २ वर्षापासून ३०० मीटर एक भाग खोदून ठेवण्यात आल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक तसेच आजूबाजूच्या गावातील आजूबाजूच्या गावातील नागरिक मुख्य बाजारपेठ आर्वी असल्यामुळे तसेच त्या भागातील विद्यार्थी सुद्धा इतरच शाळेमध्ये जाण्या येण्याकरता या रस्त्याचा वापर करतात.

मागील ४ वर्षापासून आर्वी तळेगाव रखडलेल्या मार्गाच्या कामातील गोंधळ अजून संपला नसून याच मार्गावरील शहरातील हा ३ किमीचा भाग आहे. मार्गातील सर्वात महत्त्वाचा मार्ग आर्वी शहरातून जाणारा मार्ग आहे. नवीन कंत्राटदार हे काम करणार आहे असे सांगितले जाते या मार्गाकरता लागणारी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी मात्र अजूनही केल्या गेलेली नाही. शहरातील मार्ग १४ की १० मीटरचा यासंबंधी वेगवेगळी चर्चा आहे. १४ मीटरचा जर मार्ग असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले वृक्ष तोडणे, विजेचे खांब ,पाईपलाइन यासंबंधी अजूनही कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. नवीन कंत्राटदाराला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याकरता जर दोन-तीन महिने लागले तर पुढे पावसाळा असल्यामुळे आर्वी शहरातील मार्गाचे काम होऊ शकत नाहीत त्यामुळे या मार्गाच्या पूर्णत्वाच्या बाबतीत भाकीत करणे अवघड आहेे.

४ वर्षांपासून रखडलेले कामाच्या संदर्भात राजकीय पक्षाने अनेकदा आंदोलने, रास्ता रोको, उपोषण झाली मात्र शहरातील नागरिकाच्या जीवाशी खेळणार्या या प्रश्नांकरिता सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी ऐकत्र यावे अशी सर्वसामान्य नागरिकाची भावना असून आता संतनगरी असलेल्या शहरातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अजून राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकार्यांनी अंत पाहू नये, अशी गावात चर्चा आहे.