देशातील ९० टक्के भाग डेंजर झोनमध्ये!

नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस आणि ग्लोबल वॉर्मिंगने नागरिक पुरते हैराण झाले आहेत तोच आता एक धडकी भरवणारा रिपोर्ट समोर आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारताला उष्णतेच्या लाटेचा फटका जाणवू लागल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. देशातील ९० टक्के भाग उष्माघाताच्या डेंजर झोनमध्ये आहे असा खुलासा या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. केंब्रिज विश्वविद्यालयाच्या रामित देबनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. कमलजीत रे, एसएस रे, आरके गिरी आणि एपी डिमरी या शास्त्रज्ञांसह पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन यांनी तयार केलेल्या अहवालानुसार उष्णतेच्या लाटेमुळे ५० वर्षांत भारतात १७ हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

१९७१ ते २०१९ या काळात देशात उष्णतेच्या लाटेच्या ७०६ घटना घडल्याचे म्हटले आहे. नवी मुंबईतील महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने एकाचवेळी १३ जणांचा मृत्यू झाला होता. देशाच्या इतिहासातील आजवरच्या उष्णतेच्या लाटे-संबंधित घटनेतील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. १९०१ पासून यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण महिना ठरला आहे. मार्चमध्ये पावसाने हजेरी लावल्याने उष्णता नियंत्रणात राहिली होती. परंतू, यंदाचा एप्रिल तेव्हापासून आजपर्यंतचा सर्वात उष्ण ठरलेला तिसरा महिना आहे. अद्याप एप्रिलचे १० दिवस बाकी आहेत.