“मी राष्ट्रवादीसोबत आणि यापुढेही पक्षातच राहणार’, अजित पवारांकडून “त्या” चर्चांना पूर्णविराम

मुंबई/प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण, आता स्वतः अजित पवार यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्याबद्दल आणि आमच्या सहकारी आमदारांबद्दल चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. त्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही.

४० आमदारांच्या सह्या घेतल्या आणि भाजपसोबत जाणार, असं दाखवलंय. पण, मी काही सह्या घेतल्या नाही, त्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. यामुळे आमचे कार्यकर्ते संभ्रमात जातात. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी आपापली कामे करावीते. मीही तुमच्यासारखाच माणूस आहे, त्यामुळे सहनशिलतेचा अंत पाहू नका, अशी मी सर्वांना विनंती करतो.’ ‘मी आणि आमचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि पुढेही राहणार आहोत. वेगवेगळ्या चॅनेलमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते आपले मत व्यक्त करत आहेत. त्यांनी आपापल्या पक्षाबाबत बोलावे, आमच्याबद्दल बोलू नये. आमचे वकीलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नये. आमची भूमिका मांडण्यासाठी आमचे पक्षाचे नेते आहेत. त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीत पवार साहेबांसोबतच आहे.’ ‘आमदार मुंबईला आले म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट असतेच असे नाही. आमदार त्यांच्या कामासाठी मुंबईत येतात. ही नेहमीची पद्धत आहे, यात वेगळा अर्थ काढू नका. त्यांची कामे होती, ती कामे घेऊन ते आले होते. कारण नसताना अशा बातम्या आल्या तर आमच्या मित्रपक्षातही चुकीचा संदेश जातो. काहीजण उद्ध ठाकरेंना विचारतात, पृथ्वीराज चव्हाणांना विचारतात, मी त्यांना सर्व माहिती दिलीये. मी स्पष्टपणे सांगतोय, या गोष्टीला पूर्णविराम लावा. अशाप्रकारच्या बातम्या थांबवा, अशी स्पटोक्ती अजित पवारांनी केली. त्यामुळे आता त्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.