श्रीक्षेत्र महाकालीत अवतरली दक्षिणेची वैष्णोदेवी!

वर्धा/प्रतिनिधी चैत्र पौर्णिमेला बसलेले घट हे सेवेचे पाच दिवसांचे घट असतात. १२ रोजी घट व त्रिदेवींचे विधिवत पूजन करून घटविसर्जन धाम नदीच्या पात्रात करण्यात आले. घटविसर्जना सोबत स्नान केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी जनभावना असल्याने मध्यप्रदेश, बनारस, महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून जवळपास ५ हजार भाविकांनी घटविसर्जनासोबत पवित्र स्नान केले. पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्यासह भक्तांनी विधिवत पूजन करून नदीपात्रात पवित्र स्नान केले.
त्यानंतर त्रिदेवींचे अभ्यंग स्नान, वस्त्रालंकार, शृंगार, पूजा, आरती, नैवद्य अर्पण करण्यात आले व हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी हजारो भक्तांच्या उपस्थितीत देवीचा शतचंडी यज्ञ करण्यात आले. या ठिकाणी शासनाने कोणत्याही सोयी सुविधा पुरविल्या नाहीत त्यामुळे शासनाने या ठिकाणी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी एकमुखी मागणी भक्तांनी यावेळी केली.