सावरकरांच्या काही भूमिकांना आमचा पाठिंबा नाही; शरद पवारांनी घेतली स्पष्ट भूमिका

मुंबई/प्रतिनिधी शरद पवार यांच्या सावरकरांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः त्यांचा एक जुना व्हीडिओदेखील व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये ते सावरकरांचं कौतुक करत आहेत. आज मात्र शरद पवारांनी जराशी वेगळी भूमिका मांडली आहे. सावरकरांच्या काही भूमिकेला आमचा पाठिंबा नाही, त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली ती आम्हांला मान्य नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. ते दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी सावरकर आणि हिंदुत्वाबद्दल भूमिका मांडली. दरम्यान, पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, सध्या महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न राज्यासमोर आहेत. तरीदेखील धर्म आणि जातीवरुन वाद सुरु आहे. याशिवाय काल अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवलं पाहिजे असा सल्ला पवारांनी यावेळी दिला.