गौरव यात्रेत वर्धेकर झाले सावरकर

वर्धा/प्रतिनिधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मी माफी मागायला सावरकर नाही हे वाक्य वापरून केलेल्या अपमानाच्या निषेधात आणि सावरकरांचा इतिहास पुन्हा जनतेपुढे यावा यासाठी ४ रोजी वर्धेत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. सावरकर स्मारकापासुन निघालेली यात्रेतील उपस्थिती पाहून वर्धेकर झाले सावरकर असेच म्हणावे लागेल. सावरकर स्मारकापासुन निघालेली सावरकर गौरव यात्रा पावडे चौक, अष्टभूजा चौक, वंजारी चौक, इंदिरा मार्केट, सोशालिस्ट चौक, बडे चौक, शिवाजी चौक, आर्वी नाका मार्गे फिरत सावरकर स्मारकात यात्रेचा समारोप झाला. प्रत्येकाच्या डोक्यावरील भगव्या टोपीवर आणि गळ्यातील दुपट्ट्यावर मी सावरकर असे लिहिले होते. यात्रेत मुलाच्या मृत्यूनंतर अंदमानच्या सेक्युलर कारागृहात पत्नी व सावरकरांची भेट न होऊ देण्याचा प्रसंग, विदेशी कापडाची होळी, देशातील पहिले दलितांसाठी खुले केलेले पतीत पावन मंदिरात दलितांसोबत भोजन घेताना, टिळकांसोबत सावरकर, आदी सावरकरांचा इतिहास सांगणारे चित्ररथ होते.
ग्रामीण भागातील महिला व पुरुषांचे भजनी मंडळ आणि सर्वात पुढे ने मजसी ने परत मातृभूमीला हे गाणे वाजत असलेला सावरकरांचा आकर्षक रथ होता. शहरातील मुख्य मार्गावरील विद्युत खांबांवर कालपासूनच मी सावरकर असे लिहिलेले सावरकरांचे बॅनर लक्ष वेधून घेत होतेे. वंजारी चौक, सोशॉलिस्ट चौक, बढे चौक, शिवाजी चौकात सावरकर यांचे मोठे फोटो लावून त्याला अभिवादन करण्यात येत होते. गौरव यात्रेपुर्वी सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी सावरकरांचा इतिहास मांडत काँग्रेसची लक्तरं काढली. सावरकर विदेशात जन्माला आले असते तर त्यांनी सावरकरांना देव बनवले असते.
त्यांची बुद्धीपाहून त्यांना डोक्यावर घेतले असते. ब्रिटीशांनी त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिली. त्यांना कारागृहात बैलाप्रमाणे जुंपले. परंतु, त्यांनी हार मानली नाही. त्यांना जीवंतपणीही छळले आणि आता भारतातील घाणेरडे राजकारण सावरकरांना मेल्यानंतरही छळत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस गांधी आमचे सावरकर तुमचे असे म्हणतात. सावरकरांचा त्याग आणि सावरकर साहित्यातून राष्ट्रभक्ती पेटून उठेल अशी भीती असल्याचे देशपांडे म्हणाले. काँग्रेस जोडो भारत म्हणत यात्रा काढली. आमचा भारत जोडून असल्याचे सांगून तुम्ही सावरकरांना माफीवीर म्हणता. त्यांनी ब्रिटीशांची माफी मागीतली नाही याचे पुरावश आमच्याकडे आहेत. सावरकरांसाठी आम्ही बलिदान द्यायला तयार असल्याचे सांगून त्यांनी यात्रेत सहभागींमध्ये चेतना निर्माण केली. रॅलीत हजारो सावरकर भक्त सहभागी झाले होते.